रायगड -अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी दाखल केलेली पुनर्निरीक्षण याचिकेवरील सुनावणी आता 16 जानेवारी रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील निरीक्षणाबाबत आपले लेखी म्हणणे आज न्यायालयासमोर सादर केले. आरोपी वकिलामार्फत कोणताही युक्तिवाद करण्यात आलेला नाही. याबाबत आता न्यायालय 16 जानेवारी रोजी असलेल्या सुनावणीवेळी काय निकाल देणार, हे कळणार आहे.
प्रतिक्रिया देताना अॅड. प्रदीप घरत जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे सुनावणी -अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींसह नितेश सरडा, फिरोज शेख याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रायगड पोलिसांनी या गुन्ह्यात तिघांनाही अटक केली होती. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या विरोधात रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली होती. या यचिकेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती.
विशेष सरकारी वकील यांनी दिले लेखी म्हणणे -रायगड पोलिसांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी या केसमधील सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी आपले लेखी म्हणणे न्यायालयासमोर सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने अर्णबसह दोघांना दिलेल्या अंतरिम जामीन निकालाबाबत काय निरीक्षण केले आहे. याबाबत पुनर्निरीक्षण याचिकेला त्याचा कितपत आणि काय उपयोग होईल याबाबत लेखी म्हणणे मांडले आहे.
16 जानेवारी रोजी सुनावणी -पुनर्निरीक्षण अर्जाबाबत आरोपी वकिलांनी आज कोणताही युक्तीवाद केलेला नाही. अर्णब गोस्वामी यांचे वकील न्यायालयात हजर होते. तर उर्वरित आरोपींचे वकील आज गैरहजर होते. अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी काहीही म्हणणे मांडायचे नाही, असे सांगितले. तर उर्वरित आरोपींना आपले म्हणणे मांडायचे असल्यास 16 जानेवारी रोजी मांडू शकतात, असे अॅड. प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.