रायगड - स्वराज्याची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या किल्ले रायगडावरील रोप वे वादाच्या भोवर्यात सापडल्याने मागील काही महिन्यांपासून ही सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे गडावर येणाऱ्या शिवभक्तांचे आणि पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत. अस्तित्वात असलेले रोप वे प्रशासन मनमानी कारभार करत असून आतापर्यंत त्यांनी पुरातत्व विभागासोबत अधिकृत करार देखील केलेला नसल्याची धक्कादायक बाब खासदार संभाजीराजे यांनी सांगितली आहे. यापुढे रोपवेची मनमानी सहन केली जाणार नाही असा इशारा संभाजी राजे यांनी दिला आहे. रायगडावर नव्याने दुसरा रोप वे प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
'किल्ले रायगडवर दुसरा रोप वे उभारणार'
यापुढे रोपवेची मनमानी सहन केली जाणार नाही असा इशारा संभाजी राजे यांनी दिला आहे. जुन्या रोपवेसाठी पुरातत्व विभागाची परवानगी देखील घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रायगडावर नव्याने दुसरा रोप वे प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : वासुदेव हळूहळू लुप्त होतायत
हत्ती तलावाच्या कामात भ्रष्टाचार नाही
ह्ती तलावाला पुन्हा गळती लागली असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. त्यावर भाष्य करताना, या तलावाची गळती काढण्याचे काम केवळ साठ ते सत्तर टक्केच झालेले आहे. ज्या भागातील गळती काढण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कोणतीही समस्या नसून, ज्या भागात काम झालेले नाही, त्याच भागात ही समस्या निर्माण झालेली आहे. ते काम आता सुरू करण्यात आलेले आहे. जर काम योग्य पध्दतीने झाले नसते तर हा तलाव पूर्ण भरला नसता ही बाब देखील त्यांनी निदर्शनास आणून दिली. या कामामध्ये एक रूपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि आपण तो होवू देणारही नाही असा विश्वासही खासदार संभाजीराजे यांनी यावेळेस दिला.
पुरातत्व विभागाचे काम संथ गतीने
गडावरील संवर्धन आणि उत्खननाचे काम पुरातत्व विभागामार्फत केले जात आहे. या कामासाठी अकरा कोटी रूपयांचा निधी प्रधिकरणाने पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. मात्र ही कामे अत्यंत संथतीने सुरू आहेत. या गतीने ही कामे पूर्ण होण्यास पंचवीस वर्षे लागतील. त्यामुळे ही कामे प्राधिकरणामार्फत व्हावीत यासाठी आपण पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करित असल्याचेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
गावातील रस्ते जानेवारी 2021 पर्यत पूर्ण करणार
प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या गावांतील रस्त्यांची कामे जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. सातपुते यांनी दिली. महाड रायगड मार्गाचे काम योग्य पध्दतीने न करणाऱ्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेण्यात आले आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले असून नवी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहितीही खासदार संभाजीराजे यांनी दिली.
हेही वाचा -कार्तिकी वारीत पालखी व दिंड्यांना पंढरपुरात येण्यास बंदी