रायगड - पोलादपूर तालुक्यातील आठगाव-कोंढवी फणसकोंड गावात खोदकाम सुरू असताना15 पुरातन पाषाण मूर्ती सापडल्या आहेत. कोंढवी गावातील भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी खोदकाम सुरू असताना या मूर्ती सापडल्या. या घटनेनंतर पाषाण मूर्ती पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान या पुरातन मूर्ती सापडल्याने या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी मंदिराच्या अध्यक्षांनी शासनाकडे केली आहे.
पोलादपूरमध्ये खोदकामात आढळल्या 15 पुरातन पाषाण मूर्ती - पोलादपूर भैरवनाथ मूर्ती
पोलादपूरमधील कोंढवी गावात खोदकाम करत असताना १५ पुरातन पाषाणाच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धारचे काम सुरू असताना या मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती 14 व्या शतकातील असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
![पोलादपूरमध्ये खोदकामात आढळल्या 15 पुरातन पाषाण मूर्ती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10196587-777-10196587-1610340007715.jpg)
दीड कोटी खर्च करून मंदिराचे निर्माण
जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोंढवी फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गांवांचे ग्रामदैवत भैरवनाथ आहेत. या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे काम सुरू झाले असून भव्य असे पाषाणाचे मंदिर उभारले जात आहे. दीड कोटी खर्च करून भैरवनाथाचे मंदिर बांधले जात आहे.
खोदकामात आढळल्या पाषाण मुर्त्या
मंदिराचे काम सुरू करण्याआधी पाण्याची साठवणूक करण्यासाठी हौद बांधण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. यावेळी खोदकामात माती उपसताना 15 पुरातन पाषाणाच्या मुर्ती सापडल्या आहेत. यामध्ये एक गणपतीचीही पाषाण मूर्ती आहे. या मुर्ती सध्या मंदिर परिसरातच ठेवण्यात आल्या असून भाविकांनी बघण्यास गर्दी केली आहे. या मुर्ती साधारण 14 व्या शतकातील आहेत, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.