रायगड - मुत्सद्दी, जाणता राजा, धोरणी आणि दूरदर्शी, अशी उपमा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐन निवडणूक काळातच माघार घेतली. माढा मतदारसंघातून आपला पराभव होऊ शकतो, असे दिसल्यावर पवारांनी काळाची पावले ओळखून माघार घेतल्याची बोचरी टीका महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे.
माढ्यातून पराभव दिसताच शरद पवारांनी माघार घेतली; अनंत गीतेंची बोचरी टीका - sharad pawar
पवारांनी काळाची पावले ओळखून माघार घेतल्याची बोचरी टीका महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे.

रोहा शहरातील हनुमान चौकात महायुतीची प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर भाषणातून आसूड ओढले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, शरद पवार हे मुत्सद्दी, धोरणी राजकारणी असुन त्याच्याबद्दल मला आदर आहे. शरद पवार यांनी मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले होते. त्यावेळी वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून आले. मात्र, त्यानंतर माढा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे, असे सांगितले. पण तेथूनही त्यांनी माघार घेतली.
शरद पवार यांच्यासारख्या मुत्सद्दी नेत्यालाही ऐन निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, अशी बोचरी टीका अनंत गीते यांनी केली आहे. माढाचे विजयसिंह मोहिते-पाटील, त्याचे पुत्र रणजीतसिंह मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील भाजपच्या वाटेवर आले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागले, की कमीत कमी शरद पवार यांना तरी शिल्लक ठेवा. कारण औषधाला तरी विरोधी पक्ष शिल्लक राहायला हवा. याची आठवण यानिमित्ताने अनंत गीते यांनी आपल्या भाषणातून करून देत राष्ट्रवादी काँग्रेसला टोला हाणला.