रायगड - निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने 100 कोटी दिले होते. त्यापैकी 66 कोटी 24 लाख रुपये हे घराचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना वाटप केले आहेत. तर ज्यांची जनावरे मृत झाली आहेत, त्यांना 27 लाख, वादळात मृत झालेले आणि भांडी, कपडे याचे नुकसान झालेल्यांना 87 लाख 82 हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार दोन खात्यातून निधी दिला जात असल्याने नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई अनुदान खात्यात जमा करण्यास वेळ लागत आहे.
रायगड: नुकसानग्रस्त घरांसाठी 66 कोटींचे वाटप, राहिलेली भरपाई आठवड्याभरात होणार जमा
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने 100 कोटी दिले होते. त्यापैकी 66 कोटी 24 लाख रुपये हे घराचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना वाटप केले आहेत.
आठवड्यापर्यंत नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या घराच्या नुकसानीची भरपाई खात्यात जमा केली जाईल असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. निसर्ग चक्रीवादळ होऊन आता वीस दिवस झाले असून, शासनाकडूनही आधी तातडीने 100 कोटी तर नंतर 301 कोटी असा पावणे चारशे कोटी नुकसान भरपाई निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले असले तरी अद्याप अनेकांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार नुकसानग्रस्त नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न नुकसानग्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता रविवारपर्यंत नुकसान भरपाई खात्यात जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळात कमी नुकसान झालेले आणि पूर्णतः घराचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. मात्र, ज्याच्या घरांचे नुकसान हे सहा हजारांच्यावर आहे आणि पंधरा हजार ते दीड लाखांच्या घरात आहेत अशा नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई ही दोन वेगवेगळ्या खात्यातून दिली जात आहे. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर त्याची माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरली जाते. त्यानंतर शासनाच्या नवीन सुधारित परिपत्रकानुसार दोन खात्यातून निधीची काढून बिले तयार केली जातात. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने नुकसान भरपाई अनुदान नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यास वेळ लागत असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. नागरिकांसाठी शनिवार, रविवार बँका सुरू ठेवल्या असून, या आठवड्यापर्यंत अनुदान खात्यात जमा होईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.