महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडातील धरणे, पाटबंधारे प्रकल्‍प पूर्णपणे सुरक्षित; पाहणी, सर्वेक्षणानंतर अधिकाऱ्याचा अहवाल - accident

तिवरे दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पांची पाहणी करुन त्याचा अहवाल तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते.

रायगडातील धरणे, पाटबंधारे प्रकल्‍प पूर्णपणे सुरक्षित

By

Published : Jul 9, 2019, 5:53 PM IST

रायगड- रत्‍नागिरीतील तिवरे धरण फुटीच्‍या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यातील जलसंपदा व जिल्‍हा परीषदेकडील सर्व धरणे आणि पाटबंधारे यांची पाहणी आणि सर्वेक्षण करण्‍यात आले. त्यानंतर हे सर्व प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असल्‍याचा अहवाल देण्‍यात आला आहे. ज्‍या धरणांबाबत भीती व्‍यक्‍त केली जात आहे ती देखील निर्धोक असल्‍याचा निर्वाळा अधिकांऱ्यानी दिला आहे.

तिवरे दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पांची पाहणी करुन त्याचा अहवाल तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. यासंदर्भात संबंधित प्रकल्पांची पाहणी पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग या सर्व यंत्रणांनी केली. या यंत्रणांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले असून जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प असून 49 लघु पाटबंधारे योजना व 36 पाझर तलाव आहेत. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या उमटे पाणी येथील बंधारा सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सध्या या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची मुख्य माती भिंत व पाणी सांडवा, ट्रेंच गॅलरी सुस्थितीत आहे. या धरणाच्या सांडवा भिंतीचे व खालील बाजूस असलेल्या वाफा भिंतीत किरकोळ दगड निघाले असले तरी धरणास कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे.

मृदा व जलसंधारण विभागाकडील दहा तलावांच्या पाहणीचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्यात साई, तळा तळेगाव, पहूर, देवळे, खरसई, मांडला, पाषाणे ता. कर्जत, विन्हेरे, रातवड, मेंढाण या प्रकल्‍पांचा समावेश असून सर्व धरण सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद आहे. तथापि, देवळे तलावातून पाझर सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच हेटवणे मध्यम प्रकल्पांतर्गत पन्हळघर लघुपाटबंधारे योजना येथेही निचरा चाऱ्यातून गळती होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे योजनांचे तलाव सुस्थितीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात रानवली, पाभरे, कार्ले, कवेळे उन्हेरे, ढोकशेत, घोटवडे, सुधागड, वरंध, कोथुर्डे, खिंडवाडी, खैरे, फणसाड, श्रीगाव ल.पा., भिलवले कलोते- मोकाशी, डोणवत, साळोख, अवसरे आदि योजनांचा समावेश असून ही सर्व धरणे सुरस्थितीत असल्‍याचे सांगण्‍यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details