रायगड - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी रायगडात मात्र ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत हे तिन्ही पक्ष अनेक ग्रामपंचायतीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. तर भाजप हा जिल्ह्यात स्वबळावर आणि नाराज सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना घेऊन निवडणुकीत उतरला आहे. शेकाप हा सुद्धा अनेक ठिकाणी स्वबळावर लढत आहे. तर मनसेही या निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देत आहे.
78 ग्रामपंचायतीत 612 जागांसाठी 1588 उमेदवार रिगणात
रायगड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. 88 पैकी 10 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. 78 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 844 सदस्य संख्येपैकी 612 जागांसाठी विविध पक्षाचे 1588 उमेदवार रिंगणात उतरून आपले नशीब अजमवित आहेत. 18 जानेवारीला ग्रामपंचायत मतमोजणीनंतर जिल्ह्यात कोणता पक्ष पुढे आहे, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यात आघाडी...! ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी जिल्ह्यात सर्वच पक्ष एकमेकविरोधात लढत आहेत निवडणूक-विधानसभा झाल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक असून जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्याच्या सत्तेत असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत हे पक्ष एकमेकांसमोर निवडणूक लढवीत असल्याचे चित्र आहे. तर शेकाप हा महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असला तरी त्याच्या विरोधात शिवसेनेने शड्डू ठोकले आहे. भाजप हा जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून लढताना दिसत आहे.
यश आम्हालाच मिळणार - आमदार महेंद्र दळवीमहाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहोत. मात्र स्थानिक राजकारण हे वेगळे असल्याने तेथील कार्यकर्त्यांच्या मतानुसार निवडणूक लढवीत आहोत. महाविकास आघाडीच्या कामाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे शिवसेनेला चागले यश मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे.
आघाडीत असलो तरी आम्ही स्वबळावर - माणिक जगतापमहाविकास आघाडी सरकार राज्यात असले तरी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारण वेगळे आहे. अनेक वर्ष एकमेकविरोधात लढलो आहोत. त्यामुळे यावेळीही आम्ही जिल्ह्यात एकमेकविरोधात लढून आमची ताकद दाखवत आहोत. वरच्या स्तरावर नेते एकत्र आले असले तरी जिल्ह्यात कुठल्याच खासदार आमदार किंवा पालकमंत्री यांनी निवडणूक अनुषंगाने बैठक घेतलेली नाही. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवणार आहे. अशी प्रतिक्रिया माजी आमदार माणिक जगताप यांनी फोनवर दिली आहे.
भाजप जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकेल - अॅड महेश मोहितेदक्षिण रायगडात 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप हा स्वबळावर आणि नाराज घटक पक्षांना घेऊन लढत आहे. 49 ग्रामपंचायतीमध्ये 125 उमेदवार भाजपने रिंगणात उतरविले असून जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार भाजपचे निवडून येतील असा विश्वास दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी बोलून दाखविला आहे.