रायगड - निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास वेळ लागत असला तरी, झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे हे केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तलाठी, कृषीसेवक, ग्रामसेवक यांच्यासोबत शिक्षकांनाही पंचनामे कामात सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे पंचनामे होण्यास वेळ होत असला तरी आपल्या प्रत्येक नुकसानीची नोंद प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
पंचनामे करण्यास वेळ लागत असला तरी प्रत्येक नुकसानीची नोंद घेतली जाणार - आदिती तटकरे
रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास वेळ लागत असला तरी, झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे हे केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा, पेण या तालुक्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये बागायतदार, नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून अनेक भागात नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याची तक्रार नुकसानग्रस्त नागरिक करीत आहेत. अलिबाग तालुक्यातील चौल येथे पालकमंत्री अदिती तटकरे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माहिती दिली.
जिल्ह्यातील अनेक भागात वादळाने नागरिकांची घरे, बागायत यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असल्याने महसूल यंत्रणेला पंचनामे करण्यास वेळ लागत आहेत. असे असले तरी हे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पावसाळा सुरू असल्याने अनेकांनी नुकसान झालेल्या घराची दुरुस्ती केली असली तरी घराचे, घरातील अन्नधान्य इतर सामानाच्या नुकसानीची नोंद शासन दरबारी घेतली जाईल. तसेच बागायतदार शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या प्रत्येक झाडाची तसेच वादळाने पावसात झाड पडण्याची शक्यता असेल अशा झाडाचीही नोंद घेण्यास प्रशासनास सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर छोटे व्यवसायिक यांच्या झालेल्या दुकानाचे पंचनामेही करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.