अजित पवारांची पत्रकार परिषद मुंबई Ajit Pawar On Anil Deshmukh:देशातील पाच राज्यातील निवडणुकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील सर्वच राजकीय पक्ष पूर्वतयारीला लागले आहेत. त्यामुळं अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत येथील शिबिरात लोकसभा जागा वाटपाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यासोबत त्यांनी अनिल देशमुख याच्या संदर्भात देखील गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले अजित पवार :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटानं कर्जत येथे दोन दिवसाच्या शिबीराचं आयोजन केलं होतं. शिबिराच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत जागा वाटपा संदर्भात विधान केलं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. सध्या माध्यमातून समोर येणाऱ्या जागावाटपसंदर्भातल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. आपल्याकडं असलेल्या बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा आपण लढणार आहोत. त्यासोबत इतर जागांसाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचं यावेळेस अजित पवार म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. विकास कामांना गती देण्यासाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
गाफील का ठेवलं गेलं :शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा दिला होता. मात्र त्यांनी राजीनामा परत घेतला. आम्ही मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर सर्व मंत्र्यांना वायबीच्या सेंटरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी आम्हाला गाफिल ठेवण्याचं कारण काय होतं? असंही अजित पवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतेही मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता, सर्वोच्च न्यायालयात टिकेल अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जात निहाय जनगणना करण्याची भूमिका पक्षाची असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केलाय.
अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी : पक्षाच्या सर्व बैठकीला अनिल देशमुख देखील हजर होते. ते देखील आमच्या सोबत होते. मात्र त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली. तेव्हा भाजपाकडून देशमुख यांच्या नावाला विरोध झाला. त्यांना मंत्रिमंडळात घेतलं तर भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळ घेता येणार नाही. त्यामुळं त्यांचं नाव कमी झालं, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- शरद पवारांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपानं अजित पवारांना सुपारी दिली; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
- काहीजणं पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'
- चंद्रपूर जिल्ह्यात दीड लाखातून फक्त 22 मराठा-कुणबीच्या नोंदी; 7 डिसेंबरपर्यंत चालणार नोंदीचं काम