रायगड - निसर्ग चक्रीवादळाने आंबा, काजू, नारळ, सुपारी तसेच अंतर्गत मसाले या बागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना पुढील 5 ते 7 वर्ष पिक उत्पन्न मिळणार नाही. रायगड जिल्ह्यात साधारण 22 हजार हेक्टर फळबाग शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बागायतदार शेतकऱ्यांचे पंचनामे हे आठवड्यात पूर्ण करण्यात येणार येतील. रायगडसह कोकणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना यावेळी नियमाच्या पलीकडे जाऊन मदत दिली जाणार असल्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी, नागरिक यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभा असून, पुन्हा त्याला उभे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि आढावा बैठकीसाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज (बुधुवार) जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पेण, रोहा, मुरुड, चौल रेवदंडा या नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर राजस्व सभागृहात दादा भुसे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, आमदार महेंद्र दळवी, रायगड जि.प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके उपस्थित होते.