रायगड - ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी ही आजही प्रवाशांना आपलीशी वाटत आहे. खेडोपाड्यात, डोंगराच्या कुशीत प्रवाशांना घेऊन जाणारी ही शासनाची सेवा आजही त्याच उमेदीने काम करत आहे. दरम्यान, एसटी बस सेवा देणाऱ्या चालक व वाहकांना रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी राहण्यासाठी असुविधा मिळत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. याबाबत एसटी बस वसतीच्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने त्यांच्या राहण्याची सोय करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रवासी वाहतूक करण्याच्या सुविधा आधुनिक काळात वाढल्या आहेत. रिक्षा, मिनिडोअर, प्रवासी कार यामुळे प्रवाशांना त्वरित प्रवास करण्याच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. मात्र, या प्रवासी वाहतूक सुविधा ठराविक वेळेपर्यत प्रवाशांना दिल्या जातात. मात्र, राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे इमाने इतबारे काम करत आहेत. एसटी बस ही गावागावात शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना त्याच्या इच्छित स्थळी सोडण्याची सुविधा देत असते. चालक व वाहक हे खेडेगावात शेवटची बस घेऊन जाऊन त्याठिकाणी रात्रीची वसती करत असतात. जिल्ह्यात साधारण दिडशे ते दोनशे एसटी बस चालक, वाहक हे शेवटच्या स्थानकावर रात्रीच्या वस्तीला असतात. मात्र, वस्तीला घेऊन गेलेल्या चालक व वाहकांना वस्तीच्या ठिकाणी बस सोडून दुसरीकडे जाऊन आराम करण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे चालक व वाहकांना एसटीमध्येच आराम करावा लागतो. एसटी बसमध्ये झोपत असले तरी मच्छराचा त्रास, बिना पंख्याचा वारा अशा असुविधेमध्ये चालक व वाहकांना रात्र काढावी लागते. स्वच्छतागृहाचीही पंचायत होत असते. त्यामुळे चालक व वाहकांना रात्रीच्या वसतीला गेल्यावर असुविधेला सामोरे जावे लागते.
एसटी बस ज्या गावात रात्रीच्या वसतीला असते त्याठिकाणच्या ग्रामपंचायत प्रशासनाने चालक, वाहकांची राहण्याची सोय करणे गरजेचे असते. काही ठिकाणी शाळेत व इतर ठिकाणी राहण्याची सुविधा केली जाते. अथवा नातेवाईकांकडे झोपण्याची सोय चालक, वाहकांची होत असते. मात्र, अनेकवेळेला चालक, वाहक यांना झोपण्यासाठी एसटी बसचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एसटी बस चालक व वाहक यांच्या या असुविधेकडे एसटी प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी चालक, वाहक यांना राहण्याची सुविधा ही गावातील स्थानिक प्रशासनाने करणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात नाहीत. पुन्हा याबाबत आम्ही पत्रव्यवहार करू, अशी प्रतिक्रिया रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी फोनवरून दिली.