रायगड -तिसऱ्या लाटेची संभावना आणि लहान बालकांना बसणारा कोरोनाचा धोका ओळखून जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या नवीन 75 ऑक्सिजन बेड कोविड सेंटरचे उद्घाटन आज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी नारळ फोडला तर मेट्रेन मोरे यांनी फीत कापली. या कोविड सेंटरमध्ये बालकांसाठीही आणि मोसेस रुग्णासाठीही कक्ष तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडणारा ताण या कोविड सेंटरमुळे कमी होणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयावर वाढला आहे ताण
जिल्हा सामान्य रुग्णालयात 70 बेडचे आयसीयू कोविड सेंटर आणि जिजामाता येथे 70 बेडचे कोविड सेंटर आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यातूनही कोरोना रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. मात्र सध्या वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त बेडची सुविधा करण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 75 बेडचे कोविड सेंटर तयार केले आहे.