महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेल्या ५ वर्षात आम्ही विकासकामे केलीच पण आघाडीने १५ वर्षात केलेली पाप देखील धुण्यात घालवली - आदित्य ठाकरे

१५ वर्षे सत्तेत असताना त्यांनी कोणतीही विकास कामे केली नाही ते आत्ता काय विकास करणार असा सवाल विचारून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी बारणेंनाच विजयी करा, असे अवाहन त्यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे

By

Published : Apr 22, 2019, 11:34 PM IST

रायगड- ‘लाज कशी वाटत नाही’ अशी निवडणूक प्रचाराची टॅगलाईन ठेवणाऱ्या आघाडीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. गेल्या ५ वर्षात आम्ही केलेल्या कामाची आघाडीच्या १५ वर्षांतील कामासोबत तुलना केली तर, गेल्या ५ वर्षात आम्ही विकासकामे तर केलीच पण आघाडीने १५ वर्षात केलेली पाप देखील धुण्यात घालवली, असे उत्तर देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सभेत आदित्या ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला पनवेलमध्ये जोरदार सुरुवात झाली आहे.

श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सभा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याला तोडीस तोड आव्हान देण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी देखील शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उरतले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उरण महापालिका शाळेच्या प्रांगणात प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी आघाडीच्या उमेदवारांचे चांगलेच वाभाडे काढले. १५ वर्षे सत्तेत असताना त्यांनी कोणतीही विकास कामे केली नाही ते आत्ता काय विकास करणार असा सवाल विचारून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी बारणेंनाच विजयी करा, असे अवाहन त्यांनी केले आहे.

तसेच सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या परिवाराला टार्गेट करत 'राष्ट्रवादी काँग्रेस' याचा उल्लेख 'भ्रष्टवादी काँग्रेस' असा करायला हवा, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला. गेल्या १५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ भ्रष्टाचार केला आहे. राज्यातील जिल्ह्यामध्ये जातीच राजकारण करून भांडण लावली आहेत आणि स्वतः मात्र सत्तेची ऊब घेत राहिले, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसेच आघाडीच्या काळात त्यांनी केलेला सिंचन घोटाळा, 2जी घोटाळ्यासारखे अनेक घोटाळे ते विसरू शकतात, कारण त्यांच्या हातात पैसा आलाय, मात्र सामान्य जनता कधीच विसरू शकत नाहीत. कारण त्याचे दुष्परिणाम सामान्य जनता आजही भोगत आहे. त्याचप्रमाणे मावळमध्ये जर राष्ट्रवादी पैसे वाटून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी पैसे वाटू नये, उलट तेच पैसे जमा करून ठेवा, कारण यंदा पुन्हा एकदा शिवसेना-भाजपचे सरकार येणार असून तेच पैसे तुमच्या कामी येतील, असा इशारा देखील यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवि भोईर यांची भाषणे झाली. या सभेला शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, भाजपचे शहराध्यक्ष कौशिक शहा, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना-भाजपा-रासप- युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details