रायगड -अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला. यावेळी त्यांनी पोलादपूर तालुक्यातील दुर्लक्षित असलेल्या धामणीवाडी आणि आंबेमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान दिपाली सय्यद यांनी शासनाने दुर्लक्षित गावांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
- दिपाली सय्यद यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा आणि दरडीचा फटका बसला आहे. यामुळे, मदतीचा हात म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्लक्षित राहिलेल्या धामणीवाडी आणि अंबेमाची या गावांची देखील पाहणी केली. या पाहणी दरम्यान दुर्गम भागात असलेल्या धामणीवाडी गावातील नऊ घरांना आणि सुमारे ५0 ते ६0 एकर शेत जमिनीला गेलेल्या तड्यांची पाहणी केली.
हेही वाचा -दिव्यांग आले पूरग्रस्त दिव्यांगांच्या मदतीला धावून
दरम्यान, गावातील काही कुटुंबीय उपसरपंच यांच्या घरी तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहेत. यावेळी दिपाली सय्यद यांनी गावातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि शेगडीचे वाटप केले. दिपाली सय्यद यांनी पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची गावानजीक रस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी केली. २२ जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेमाची गावाकडे जाणाऱ्या डोंगरातील मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरडीचा ढिगारा कोसळल्याने रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे दरडीच्या मातीतून पायवाटेने मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान, आंबेमाची गावातील गावकऱ्यांना नाणेघोळ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
- नरेंद्र मोदी, शरद पवार यांनी लक्ष देणे गरजेचे -
दिपाली सय्यद यांनी सुमारे दोन किलोमीटर कच्च्या रस्त्यावरील दगडांतून चालत जाऊन कोसळलेल्या दरडीची पाहणी केली. गावाकडे जाणाऱ्या या मार्गावर दरड कोसळल्याने सुमारे १६ ते १७ दिवसांपासून ही दरड हटवण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शासनाने तातडीने ही दरड हटवण्याची मागणी दिपाली सय्यद यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागाकडे लक्ष केंद्रित करून कोकणातील रहिवाशांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -कोल्हापुरातील शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा आक्रोश; 52 गावातील ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक