रायगड- बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना जामीन मिळता कामा नये, पेणमधील चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. या गुन्ह्यातील आरोपीला या आधी बलात्काराच्याच गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने मानवतेला काळिमा फासणारा बलात्कार आणि हत्येचा गुन्हा केला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळता कामा नये तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी, यासाठी गृहमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची अमानुष घटना घडली. त्या मुलीच्या कुटुंबीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली