रायगड- तांत्रिक पुराव्याच्या आधारे कर्जत येथे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताज आलम उमर अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. पत्नीला वारंवार फोन करून त्रास दिल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक - murder in karjat
पत्नीला वारंवार फोन करून त्रास दिल्याच्या रागातून ताज आलम उमर अन्सारी याने नाशिक येथून कर्जत येथे भेटण्यासाठी बोलवत रेल्वे प्लॅटफॉर्मच्या पुढे पटरीलगत घेऊन जाऊन एकाची दगडाने ठेचून हत्या केली.
18 नोव्हेंबरला संध्याकाळी कर्जत येथील शनि मंदिरापासून दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेल्वे हद्दीतील गोदामाच्या मागे एक मृतदेह सापडला होता. हा खून होता हे पोलीस तपासात निष्पन्न झाले. परंतु, मृतदेह स्थानिक नसल्याने त्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे तपासात अडथळे येत होते. लागलीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पोलीस पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. यात मृत व्यक्तीचे नाव झहीरुद्दिन बशीर बक्ष असून तो मध्यप्रदेशातील खरवा येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने मृताच्या नातेवाईकांशी संपर्क करून, त्यांच्याकडून घटनेच्या अनुषंगाने माहिती मिळवली. त्याचप्रमाणे तांत्रिक पुरावे गोळा केले. तांत्रिक पुरावे आणि मिळालेल्या माहितीची वस्तुनिष्ठ सांगड घालून ताज आलम उमर अन्सारी, सध्या रा. मोहोपाडा, ता.खालापूर मूळ रा. मध्यप्रदेश हा संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
मृत आणि आरोपी अन्सारी हे दोघेही एकाच गावातील रहिवाशी असून मृत हा वेगवेगळ्या मोबाईल नंबरने आरोपीच्या पत्नीस फोन करून नेहमी त्रास देत असे. ही बाब आरोपीच्या पत्नीने आरोपीच्या कानावर घातली. त्यानंतर त्याचा काटा काढण्याचा निर्णय अन्सारीने घेतला. त्यानुसार नाशिक येथून कर्जत येथे भेटण्यासाठी बोलवत रेल्वे प्लॅटफॉर्मच्या पुढे रेल्वेरुळा जवळ नेत त्याला दगडाने ठेचून जीवे मारल्याची कबुली दिली.
या गुन्हाच्या तपासाची कामगिरी पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पथकाने पार पाडली.