रायगड -मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. विश्वास तुळशीराम वाघमारे (रा. निंबोडे दांडवाडी, खालापूर) या आरोपीला दोन वर्षानंतर पकडण्यात खालापूर पोलिसांना यश आले आहे. आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा - .... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फूड प्लाझाजवळ प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडत होते. फूड प्लाझाजवळ २०१८ साली प्रवाशांना लुटून दरोड्याचा प्रकार घडला होता. या दरोड्याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी विश्वास वाघमारे सोडून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, विश्वास वाघमरे हा फरार झाला होता. दोन वर्षांपासून वाघमारे आपल्या घरी अथवा नातेवाईक यांच्याकडे आला नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना कठीण जात होते. याबाबत न्यायालयाने आरोपीला पकडण्यास वारंटही काढले होते. मात्र आरोपी विश्वास वाघमारे हाती लागत नव्हता.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुन्हा आरोपीला पकडण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती. अशा वेळेस खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी पोलीस ठाणेमधील पोलीस योगेश जाधव, रणजीत खराडे, संदीप मोराळे, पोशी दत्ता किसवे यांचे पथक नेमले होते. गुप्त खबऱ्याकडून या पथकाला आरोपी गावी आली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपी विश्वास वाघमारेच्या मुसक्या खालापूर पोलिसांनी आवळल्या. या आरोपीला खोपोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा - भाजपच्या उमेदवाराला संतप्त ग्रामस्थांनी विचारला जाब, नंतर घडले असे काही...