रायगड -अलिबाग-पेण रस्त्यावर वाडगाव नजिक पिकअप व्हॅनने दोन महिलांना जोरधार धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रेरणा प्रदीप पवार, असे मृत महिलेचे नाव असून सुशीला वसंत आंग्रे, असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी सुशीला यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, वाहन चालक प्रजापती याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सुशीला वसंत आंग्रे व प्रेरणा प्रदीप पवार (दोघीही रा. वाडगाव) या अलिबाग येथून आपली कामे आटोपून वाडगावला येत होत्या. दरम्यान, वाडगाव नजिक विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप व्हॅनने ( क्र. एमएच ०६/ बीडब्लू १६५३) या दोघींना जोरदार धडक दिली. यात प्रेरणा पवार या जागीच ठार झाल्या, तर सुशीला या जखमी झाल्या. या अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी त्वरित रुग्णवाहिका बोलवून सुशीला यांना रुग्णालयात हलवले, तर मृत प्रेरणा यांचा मृतदेह देखील रुग्णालयात पाठवला.