रायगड -नवजात बालकापासून ते पाच वर्षे वयापर्यंत बालकांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत लसीकरण कार्यक्रम देशभरात राबविला जात असतो. यासाठी प्रत्येक राज्याला, जिल्ह्याला लसीकरण लक्ष्य पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राकडून दिलेल्या असतात. रायगड जिल्ह्यात कोरोना महामारी काळ सुरू असतानाही बालकांना देण्यात येणाऱ्या लसीकरण अभियान हे उत्तमपणे सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 75 टक्के लसीकरण हे पूर्ण झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाकडे लसीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना महामारी सुरू असताना एकही मुलगा लसीपासून वंचित राहिलेला नाही.
दिल्या जातात 'या' लसी
शून्य ते पाच वर्षीय बालकांना तसेच दहा वर्षे, सोळा वर्ष मुलांना कोणत्याही आजाराने धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस दिली जाते. यामध्ये बीसीजी, हिपॅटायटीस-बी, ओपीव्ही 3, रोटा व्हायरस लस, गोवर, व्हिटॅमिन ए, पेंटा 3, डीपीटी, टीडी, मसल्स पहिला, दुसरा डोस, प्रतिबंधात्मक इंफॅट्स, विटा 1, टीडीटी ह्या लसी दिल्या जातात. ग्रामीण भागासह शहरातील बालके आणि मुलांना या लसी वयोमानानुसार दिल्या जातात.
कोरोनाकाळातही लसीकरण मोहीम जोरात
2020-21 या वर्षाचे लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 75 टक्के उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेने पूर्ण केले आहे. कोरोना महामारी मार्च महिन्यापासून सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा या आजारावर मात करण्यासाठी झटत आहे. असे असले तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कमी पडलेली नाही. जिल्ह्यातील कोणतेही बालक आणि मूल कोरोनाकाळात लसीकरणपासून वंचित राहिलेली नाहीत. कोरोनाबाधित क्षेत्रातील बालकांना आणि मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात बोलावून त्याचे लसीकरण केले असल्याची माहिती लसीकरण विभागाचया परिचारिका विजया भोसले पाटील यांनी दिली आहे.