नवी मुंबई - पनवेल तालुक्यातील बामनडोंगरी गावचे माधव पाटील हे व्यावसायाने पत्रकार आहेत. 1985 साली त्यांचं उरण तालुक्यातील खोपटे गावच्या एका तरुणीशी लग्न ठरलं होतं. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विश्वासघाताने ते लग्न मोडलं. माधव पाटलांच्या मनात महिला वर्गाबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली व त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेत पत्रकारिता करत स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं. त्यांनी उरण, पनवेल कित्येक तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडली.
संघर्ष हा माझ्या पाचवीलाचं पुजला आहे असे माधव पाटील सांगतात. वयाच्या पाचव्या वर्षी आईच निधन झालं, त्यानंतर वडिलांनी दुसर लग्न केलं, तिथेही संकट माधव पाटलांची वाट पाहत होतं. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या डोळ्यादेखत वडिलांचा खून करण्यात आला होता. सावत्र आईने त्यांना पोटच्या पोरांप्रमाणे माया दिली. वयाच्या तरुणपणी तिसाव्या वर्षी लग्न मोडल्यानंतर त्यांना लग्न करण्यासाठी आईने-नातेवाईकांनी गळ घातली. मात्र त्यांनी कधीही लग्नाबद्दल सकारात्मक विचार केला नाही. कोरोनाच्या काळात आलेलं एकाकीपण घरात 88 वर्षांची वृद्ध आई, पाहता आपल्यालाही जिवाभावाचं कोणीतरी असावं, असा विचार करत माधव पाटील यांनी अखेर लग्न करण्याचा विचार केला.