महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल - panvel COVID-19 quarantine centre

पनवेलमधील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी 1 हजार खोल्यांचे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पनवेल, उरण आणि नवी मुंबईतील संशयित कोरोना रुग्ण ठेवले जातात.

panvel
पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

By

Published : Jul 18, 2020, 12:25 AM IST

रायगड(पनवेल)- पनवेल तालुक्यातील कोन येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या कोरोना संशयित महिलेवर 25 वर्षीय कोरोना संशयित तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन असलेल्या या दोघांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

पनवेलमधील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी 1 हजार खोल्यांचे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पनवेल, उरण आणि नवी मुंबईतील संशयित कोरोना रुग्ण ठेवले जातात. त्याचबरोबर जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे अशा रुग्णांवर येथे उपचार केले जातात.

गुरुवारी रात्री या सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल तालुक्यातील कोरोना संशयित असलेल्या एका महिलेला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधित महिलेवर 25 वर्षांच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला व आरोपी या दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे.

कोरोना संकटाशी सर्वजण एकत्रित सामना करत असताना अशाप्रकारे लैंगिक अत्याचाराची घटना घडणे, ही बाब दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, महिला व पुरुष संशयित रुग्णांना स्वतंत्र क्वारंटाईन केले जाते. असे असताना महिला असलेल्या ठिकाणी संबंधित तरुण पोहोचला कसा? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details