रायगड- जिल्ह्यात पायी चालत आणि वाहनाने येणाऱ्या चाकरमान्यांची खारपाडा येथे चेकनाक्यावर तपासणी आणि नोंद करण्यात येत आहे. यानंतर त्यांना प्रशासनाने आणि सामाजिक संस्थानी दिलेल्या वाहनाने त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. 11 मेपासून 18 मेपर्यंत जिल्ह्यात 37 हजार नागरिक दाखल झाले आहेत. यापुढे त्यांना खारपाडा येथून पायी चालत पाठविले जाणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी याबद्दल माहिती दिली.
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र याठिकाणी काम करत आहेत. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यातील चाकरमानी हे आता गावाकडे येऊ लागले आहेत. वाहतूकसेवा बंद झाली असल्याने अनेक नागरिक हे पायी चालत अथवा खासगी वाहनाने जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यात चालत येणाऱ्या चाकरमानींपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रशासनाने पायी चालत येणाऱ्या नागरिकांची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.