धक्कादायक..! पेणमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या - पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
14:01 December 30
धक्कादायक..! पेणमध्ये अडीच वर्षीय मुलीवर बलात्कार; अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू
रायगड- जिल्ह्यातील पेण येथे 3 वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पेण येथील प्रायव्हेट विद्यालयाच्या मागील बाजूस वडगाव येथे रात्री हा प्रकार घडला. तिथेच तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. तिचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पेण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आदेश पाटील असे आरोपीचे नाव आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबागच्या तरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे. सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे. गुरुवारी पेण बंदची हाक पेणकरांनी दिली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत.
बलात्कार करून केली मुलीची हत्या
पेण तालुक्यातील वडगाव येथील आरोपी आदेश पाटील याने बाजूला असलेल्या आदिवासी वाडीवरील एका तीन वर्षीय मुलीला 29 डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झोपेत उचलून घेऊन गेला होता. त्यानंतर बाजूला असलेल्या हायस्कुलच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये यासाठी नराधमाने तिची हत्या करून पसार झाला. सकाळी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह नागरिकांनी पाहिल्यानंतर घटना समोर आली. त्वरित नागरिकांनी पेण पोलिसांना याची माहिती दिली.
आरोपीला अटक
पेण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी त्वरित तपास करून आरोपी आदेश पाटील याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिवासी समाजात संताप
या घटनेनंतर आदिवासी समाजात संताप व्यक्त होत असून पेण पोलीस ठाणे आणि सरकारी रुग्णालयाबाहेर आदिवासींनी गर्दी केली आहे. पेणमधील वातावरण तंग असून स्थानिक पोलिसांच्या मदतीला विशेष धडक कृती दलाची कुमक मागवण्यात आली आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
आरोपी आदेश पाटील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने आधीही आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा केला आहे. याबाबत तो अलिबाग तरुंगात शिक्षा भोगत होता. त्याने एका 16 वर्षीय मुलीला पळवून नेण्याचाही गुन्हाही केला आहे. सध्या तो पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर त्याने पुन्हा हे कृत्य केले आहे.