रायगड -एकीकडे निसर्गाने बेघर केले तर दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी तात्पुरती झोपडी बांधण्यासाठी परवानगी देत नाहीत. ही अवस्था अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी आदिवासी कुटुंबाची झाली आहे. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली 25 कुटूंब आज वन विभागाच्या मोकळ्या जागेवर तात्पुरती झोपडी बांधून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वन विभागाचे अधिकारी त्यांना झोपडी बांधू देत नाहीत. सध्या 25 कुटुंबातील दीडशे जण एकाच छताखाली राहत असून ते उघड्यावर चुल मांडून जेवण बनवत आहेत. अशात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाय करून आमच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची मागणी आदिवासी बांधवानी केली आहे. वेलटवाडीच्या या आदिवासी कुटुंबाचा घेतलेला हा स्पेशल आढावा...
अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या निसर्गरम्य डोंगरावर 25 आदिवासी कुटूंब गेली दीडशे वर्ष गुण्यागोविंदयाने राहत होती. 2019 साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटूंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागले. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबाच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवाशींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजूरीही दिली. मात्र दिलेल्या जागेतील काही भागावर वन विभागाचे कलम 35 लागले आहे. या कलमानुसार त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. यामुळे आदिवाशी कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली. याबाबत प्रशासनाने वन विभागाला सहकार्य करण्याची विनंती केली. पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आडमूठ्या भूमिकेमुळे आदिवासींना जागा उपलब्ध असूनही अद्याप घरे बांधता आलेली नाहीत.
वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिवासी कुटुंबाची होलपट झाल्याने, अखेर ही कुटुंब पुन्हा आपल्या मूळ वाडीवर जाऊन वास्तव्य करू लागली. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने आदिवासी कुटुंबाची घरे ही पत्त्यासारखी कोसळली. वादळात आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने सारी कुटुंब डोंगरातून एकमेकांच्या साहाय्याने आबालवृद्धांना घेऊन डोंगराच्या पायथ्याशी येऊन विसावली. कष्टाने बांधलेला संसार हा डोळ्यासमोर उध्वस्त झाला. ही कुटूंब आता बेघर झाली आहेत. शाळेत आणि बांधलेल्या पत्राच्या शेडमध्ये 25 कुटूंबातील दीडशे जण दाटीवटीने राहत आहेत. आदिवासी कुटूंबाकडे गॅस, स्टो नसल्याने बाहेरील उघड्या जागेवर चूल पेटवून जेवण शिजवत आहेत. निवाऱ्यात लहान मुले आणि महिलांना झोपण्याइतकीच जागा आहे. यामुळे पुरूष बाहेर झोपत आहेत.