रायगड -रायगड हा पर्यटन जिल्हा आहे. त्याचबरोबर तो एक औद्योगिक जिल्हाही आहे. औद्योगिक क्षेत्र हे मोठे असल्याने कंपनीमध्ये आग लागून, स्फोट होऊन अपघाताचे घटनाही नेहमी होत असतात. त्यामुळे मानवी अपघात, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. अशावेळी कंपनीतर्फे कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे असते. पण अनेकवेळा याकडे दुर्लक्ष झाल्याचे नेहमी अपघात घटनेनंतर दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 24 अपघात झाले असून 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर खाजगी 2 व्यक्ती आणि 6 जण जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात 1400 कंपन्या
रायगड जिल्ह्यात रोहा, महाड, खालापूर, माणगाव, खोपोली, रसायनी या परिसरात जवळजवळ 1400 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. यामध्ये रासायनिक, औषध निर्मित, खत निर्मित, स्टील, खाद्य पदार्थ, मद्य अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या अभावामुळे अपघाताच्या घटना होत असतात. यामध्ये आग, प्राणघातक, स्फोट, वायुगळती होऊन अपघात होत असतात. त्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते.
जिल्ह्यात वर्षभरात 24 अपघात 14 मृत्यू
रायगड जिल्ह्यात वर्षभरात औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत 24 अपघात झाले असून 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राणघातक 10, आग 7, स्फोट 2, वायुगळती 5 असे एकूण 24 कंपनी अपघात झाले आहेत. प्राणघातक अपघातात 12, आगीत 1, स्फोटात 2, असे एकूण 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 2 नागरिकांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले आहेत.
कंपनीकडून सुरक्षेचा अभाव
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून याठिकाणी वायुगळती, स्फोट, आगीच्या घटना वारंवार होत असतात. मात्र कंपनी प्रशासनाकडून अथवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाने अपघात होत असतात. अशा वेळी कंपन्यांची आणि कर्मचारी याची सुरक्षा करणे महत्त्वाचे असते. मात्र अनेकवेळा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.
वर्षातून दोन वेळा अग्निशामक परीक्षण करणे गरजेचे
कंपनी, शैक्षणिक संस्था हायरिस्क इमारती यांनी दरवर्षी अग्निशामक परीक्षण जानेवारी आणि जून महिन्यात करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कंपनीमधील अग्निशामक उपकरणे चालू आहेत की नाही हे बघणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामक विभागाकडून एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून परीक्षण करून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा एखादी घटना घडल्यानंतर त्यावेळी उपकरणे सुस्थितीत नसतील तर साशंकता निर्माण होते. त्यामुळे कंपनी प्रशासनाने अग्निशामक परीक्षण करणे अंत्यत महत्त्वाचे आहे. म्हणजे होणारे अपघात टाळू शकतात, अशी माहिती अग्निशामक दल प्रमुख हरिदास सूर्यवंशी यांनी दिली आहे.
अग्निशामक विभागाकडून प्रात्यक्षिक शिबिरे
औद्यगिक क्षेत्रात वायुगळती, आग, स्फोट, प्राणघातक घटना होत असतात. कंपनीतील असे अपघात टाळण्यासाठी अग्निशामक विभाग तसेच प्रशासनाकडून प्रात्यक्षिक शिबिरे जिल्ह्यात आयोजित केली जातात. या शिबिरात कंपनीत होणाऱ्या अपघात घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केली जावी, अपघातग्रस्तांना कसे वाचवावे, याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. त्यामुळे औद्यगिक क्षेत्रात होणारे संभाव्य धोके टाळणे शक्य होते.
कंपनी अपघातात जीवितहानी आणि वित्तहानी
ही कंपनी होत असलेल्या अपघाताने कर्मचाऱ्यांची जीवितहानी तर होतेच पण आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असते. कर्मचारी याचा कंपनी अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंब याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी कंपनी काही आर्थिक मदत करीत असते. मात्र अनेक अपघातात कंपनी प्रशासनाकडून मदतीचा हात आखडता घेतला जातो. तर आग, स्फोट या अपघातात कंपनीचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. अपघात टाळण्यासाठी कंपनी प्रशासनाचीही तेव्हढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र अनेकवेळा कंपनीकडूनही याकडे कानाडोळा होताना दिसत असल्याने अपघाताचे प्रमाण हे वाढतच आहे.