रायगड- कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन करून परतत असणाऱ्या कल्याण परिसरातील महिला भक्तांच्या वाहनाचा खोपोलीच्या बोरघाटात आज अपघात झाला. वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ते वाहन उलथत दोन दुचाक्यांनाही ठोकर दिली. या अपघातात टेम्पोमधील अकरा महिला, दोन लहान मुले व दोन दुचाकीस्वार, असे पंधरा जण जखमी झाले आहेत.
या मार्गाने वाहन उतरविण्यास मनाई असताना काही चालक या बाजूने वाहन उतरवतात व उताराचा अंदाज न आल्याने अपघात होतात. दोनच दिवसांपूर्वी या बोरघाटात प्रवासी बसचा अपघात झाला होता व त्यात 5 जणांचा जीव गेला होता.
या अपघातात कल्याण, शहाड परिसरातील काही महिला कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनास आल्या होत्या. त्या एका टेम्पोत मागे आपल्या मुलांसह बसल्या होत्या. त्यांचा टेम्पोचा खंडाळा ते खोपोली असा जूना बोरघाट मार्गे घाट उतरताना ब्रेक फेल झाला. यामुळे चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले तेव्हा एका तीव्र उताराच्या वळणावर हा टेम्पो वेगात उलटला व 50 फुट फरफटत गेला. त्याच वेळी टेम्पोने पुण्याकडे जाणाऱ्या दोन दुचाक्यांना धडक दिली. अपघातात टेम्पोतील सर्वच महिला जखमी झाल्या सर्वांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तर दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.