पुणे - पुण्यातील खडकवासला धरणात बुडून एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला ( 13 years old Boy Drowned in Khadakwasla Dam ) होता. त्यानंतर आज दोन दिवसांनी त्याचा मृतदेह हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये सापडला आहे. मयुर बापू मरगळे (वय 13) असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे.
मृतदेह सापडला कॅनॉलमध्ये - पावसाळा सुरू झाला असला तरी पुण्यात उन्हाचा चटका कमी झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील खडकवासला धरणात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पोलीस बंदोबस्त असला तरी काही पर्यटक हे लपून छपून पाण्यात जातात. अश्यातच मयूर हा सोमवारी खडकवासला धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा प्रवाह जास्त होता व मयुरला पोहता येत नव्हते, त्यामुळे तो बुडाला. स्थानिक पोलीस, अग्निशामक दलाच्या दोन दिवसीय शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह आज हडपसर येथील कॅनॉलमध्ये सापडला आहे.