पुणे:या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी इब्राहिम सय्यद (वय 38 वर्षे), कृष्णा सोनाजी गिरी आणि अल्ताफ शेख यांना अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात झालेल्या पोलीस भरतीच्या काळात पुणे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे दहावी, बारावीचे बनावट सर्टिफिकेट बनवून देत आहेत. त्याआधारे पुणे गुन्हे शाखेकडून माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर बनावट ट्रॅप तयार करण्यात आले. 1 मे रोजी स्वारगेट परिसरात सापळा रचून या टोळीतील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता टोळीतील मुख्य आरोपीसह तीन जणांना राज्यातील धाराशिव, सांगली आणि छत्रपती संभाजी नगर येथून अटक करण्यात आली आहे.
'या' संस्थांचे बोगस प्रमाणपत्र वितरित: भामट्यांनी 'महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल', संभाजीनगर या बोर्डाकडून दहावी आणि बारावीचे तब्बल 741 प्रमाणपत्र दिले. तर 'अँमडस विद्यापीठ', संभाजीनगर या विद्यापीठाच्या नावाने बीएसस्सी, बी.कॉम आणि बीएचे 626 प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर 'महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन' या बोर्डाच्या माध्यमातून डिप्लोमा, आय.टी.आय आणि इंजिनिअरिंगचे 630 प्रमाणपत्र दिले गेले. तर 'बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन', मराठवाडा संभाजीनगर या बोर्डाकडून दहावी आणि बारावीचे 733 प्रमाणपत्रही देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मुक्त विश्वविद्यालाच्या बोर्डाच्या माध्यमातून बीएस्सी, बी.कॉम आणि बीए ग्रॅज्युएशनचे 05 प्रमाणपत्र हे देण्यात आले आहे. 'अलहिंद युनिव्हर्सिटी'च्या नावाने बीएसस्सी, बी.कॉम, बीए ग्रॅज्युएशनचे 04 प्रमाणपत्र असे एकूण 2739 बोगस डिग्री प्रमाणपत्र देण्यात आले आहे.