पुणे : चित्रपट पाहून बाहेर आलेल्या तरुणाचा टोळक्याने चाकू हल्ला करुन निर्घृण खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 15 ऑगस्टच्या मध्यरात्री मंगला टॉकीज परिसरात घडली. नितीन मस्के असे त्या निर्घृण खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रात्री एक वाजता घडला खुनाचा थरार :नितीन मस्के हा तरुण 15 ऑगस्टच्या दिवशी रात्री 'मंगला टॉकीज'मध्ये चित्रपट पाहण्यासाठी आला होता. यावेळी रात्री एकच्या सुमारास तो चित्रपट पाहून बाहेर पडला. यावेळी हातात तलवार, चाकू, रॉड घेऊन दहा ते बारा माथेफिरूंनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. खुनाचा हा थरार रात्री एक वाजता मंगला टॉकीजसमोर घडल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील मंगला चित्रपटगृहासमोर 10 ते 12 जणांनी तलवारी, काठ्या, लोखंडी रॉडने वार करून नितीन म्हस्के या तरुणाची हत्या केली आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याने ही हत्या झाली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.- संदीप गिल, डीसीपी
307 बदला घेतला 302 ने :नितीन मस्के या तरुणाचा पुण्यातील कोरेगाव पार्क येथे काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादात नितीन मस्के याने गुन्हेगार टोळीतील काही जणांना मारहाण केली होती. तेव्हापासून हे टोळके नितीन म्हस्के याच्या मागावर होते. नितीन हा मंगळवारी रात्री पुण्यातील मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आला होता. रात्री 1 वाजता चित्रपट संपल्यानंतर नितीन मस्के बाहेर पडल्यानंतर त्याला 10 ते 12 जणांनी घेरले. यावेळी हातात असलेल्या तलवार, काठ्या, लोखंडी रॉडने वार करत आरोपींनी नितीन मस्केवर सपासप वार केले. वार करुन हे सर्व त्या ठिकाणाहून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीन म्हस्केचा यामध्ये मृत्यू झाला आहे. नितीन मस्के याच्या खुनानंतर आता पुणे पोलीस कसून तपास करत आहेत.