पुणे- चारचाकी गाडीला कट मारल्याचा रागातून तिघांनी पाठलाग करून दुचाकीस्वार तरुणाला अडविले आणि चाकूचे वार करून त्याचा डोळा फोडला. ही घटना शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढवा चौकात घडली होती. सतीश वानखेडे, असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी 48 तासात आरोपींना अटक केली. योगेश चंद्रकांत हनमने (वय 24 वर्षे), रितेश अंबादास जाधव (वय 21 वर्षे) आणि अविनाश सुनील गायकवाड (वय 22 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. अन्य एकाचा शोध सुरू आहे. यातील जखमी सतीश वानखेडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - मोबाईल बनला संगीत शिक्षक, ऐका...लहान मुलाचे मधुर बासरी वादन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सतीश वानखेडे शनिवारी पहाटे मित्रांसोबत जात होते. यावेळी गाडीला कट का मारला?, अशी विचारणा करत आरोपींनी चाकूने डोळ्यावर आणि शरीरावर वार केले. पोलिसांकडे प्रकरण जाताच घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांनी एका संशयित गाडीचा शोध घेतला. गाडीच्या बोनेटवर असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशावरून त्यांनी गाडीचा शोध घेतला. त्यानंतर आरटीओकडून माहिती घेऊन पुणे आणि मुंबई येथून 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
जखमी सतीश वानखेडे उच्चशिक्षित आहे. त्यांनी मेडिकलमधून डोळ्यासंबंधीचा कोर्स पूर्ण केला. परंतु, या किरकोळ वादातून त्यांचाच एक डोळाच निकामी झाला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी ही बुजगावणी - बच्चू कडू