पुणे:हडपसर येथील खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी स्वाती अक्षय जाधव (वय २२, रा. साई पॅराडाईज हाऊसिंग सोसायटी, खंडोबा माळ, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा नवरा अक्षय आनंदा जाधव (वय २५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वाती यांचे वडील विनायक मारुती थोरात (वय २९, रा. नवनागापूर एमआयडीसी, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
असे जुळले प्रेम: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक थोरात हे नगर जिल्ह्यातील व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे जेसीबी वाहन आहे. आरोपी अक्षय हा त्यांच्या जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. याच काळात स्वाती आणि अक्षयमध्ये प्रेम जुळले. स्वाती हिने अक्षय सोबत पळून जाऊन लग्न केले होते आणि ते घरच्यांपासून वेगळे राहत होते.
पत्नीचा खून अन् स्वत:चाही आत्महत्येचा प्रयत्न: लग्नानंतर स्वाती जाधव आणि अक्षय जाधव हे पुण्यातील फुरसुंगी या भागात राहत होता. बुधवारी मध्यरात्री कौटुंबिक वादावरून अक्षय याने स्वातीचा खून केला. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षय याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.