पुणे -रात्रीच्या वेळी चोरट्यांनी एका तरुणाची चार चाकी गाडी अडवून कोयत्याचा धाक दाखवत 'गुगल पे'द्वारे त्याची लूट केली. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा अनोखा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी जलदगतीने तपास करीत तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी केतन पाटील (32) यांनी फिर्याद दिली. सदाशिव उर्फ सद्या प्रकाश गायकवाड (21), शुभम उर्फ पप्पू रघुनाथ लभडे (21) आणि विकास विष्णू गादेकर (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रोख रक्कम नसल्यामुळे 'गुगल पे'द्वारे तरुणाची लूट; पुण्यातील प्रकार - sinhagad road police station
गुगल पे द्वारे लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी तरुण 6 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास मित्राच्या घरी निघाले होते. डीएसके विश्व नांदेड फाटा या रस्त्याने प्रवास करत असताना तीन अज्ञात आरोपींनी रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी उभी करून त्यांना अडवले. त्यानंतर गाडीची चावी काढून घेत शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, फिर्यादी जवळ पैसे नसल्यामुळे त्यांनी 'गुगल पे'द्वारे तीन हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. जिवाच्या भीतीने फिर्यादीने ते सांगतील त्याप्रमाणे केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कारची चावी दिली आणि ते पसार झाले.
फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या नंबरवर पैसे ट्रान्सफर करण्यास आरोपींनी भाग पाडले होते त्याचा शोध घेऊन पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे.