बारामती (पुणे) -तालुक्यातील निंबुत गावच्या दीपक जगताप व गणेश जगताप या युवा शेतकऱ्यांनी केलेली अंजिर शेती ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोड मॉडेल ठरली आहे. या अंजिर शेतीचे धडे घेण्यासाठी राज्यभरातून असंख्य शेतकरी निंबुत या गावी दाखल होत आहे. चिकाटी, मेहनत आणि अंगी संशोधन वृत्ती असेल, तर शेतकरीदेखील इतरांना मार्गदर्शक ठरू शकतो. हे या युवा शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
बाजारपेठेचे योग्य ज्ञान असल्याने फायदा -
दीपक व गणेश या युवा शेतकऱ्यांनी २००८ साली अंजिर बागेची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी बागेच्या व्यवस्थापनातील बारकाव्यांचा अभ्यास केला. तसेच एक एकर क्षेत्रात असणाऱ्या बागेचा विस्तार करून त्यांनी सहा एकरपर्यंत वाढवली. गतवर्षी व यंदादेखील अतिपावसाने पुरंदर तालुक्यातील ७० ते ८० अंजिर बागांचे मोठे नुकसान झाले. तसेच करपा, तांबेरा या प्रमुख रोगांमुळे अनेक अंजिर बागा उद्धवस्त झाल्या. मात्र, या युवा शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेच्या केलेल्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे अंजिरावर पडणाऱ्या तांबेरा व करपा हे रोग त्यांच्या बागेकडे फिरकलेच नाहीत. जगताप यांच्या बागेत खट्टा-मीठा, असे दोन्ही प्रकारचे अंजिर पीक घेतले जातात. त्यांच्या बागेतील अंजिर महिनाभर आधीच कोल्हापूर, सांगली, मिरज या बाजारपेठांमध्ये दाखल होतो. त्यामुळे त्यांच्या अंजिर फळाला चांगला दर मिळतो.
जगताप बंधू 'अंजिर रत्न' पुरस्काराने सन्मानित -
दीपक व गणेश यांचा अंजिर पिकासंदर्भात असणाऱ्या अभ्यासाचा व संशोधनाचा फायदा राज्यभरातील शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य शासनाने २०१७ साली आखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादक संशोधक संघाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती केली. तर २०१८ साली दीपक जगताप यांना राज्य शासनाने 'अंजिर रत्न' पुरस्काराने सन्मानित केले. बागेच्या व्यवस्थापनासाठी निंबुत येथील कृषी सहायक प्रविण माने यांचेदेखील जगताप बंधूना सहकार्य मिळत आहे.