पुणे :आजपर्यंत आपण येरवडा कारागृहात एखादा कैदी जेलमध्ये असला की, त्याचे नातेवाईक हे कॉइन बॉक्सच्या माध्यमातून बोलताना आपण पाहिले आहे. पण राज्यात प्रथमच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरीता प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध झाली आहे. याचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. आता कैदी देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या घरच्यांशी संवाद साधणार आहे.
का केली सुविधा सुरू : सद्यस्थितीत बंद्यांकरीता नातेवाइकांशी संपर्क करण्याकरीता कॉइन बॉक्स सुविधा आहे. परंतु हे कॉइन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध नाहीत. तसेच हे कॉईन बॉक्स नादुरूस्त झाल्यास सहजासहजी दुरूस्त करून मिळत नाही. यामुळे बहुतांशी ही सुविधा बंद झाली होती. तसेच ज्या बंद्यांना अतिसुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स ज्या ठिकाणी बसविण्यात आला आहे, त्या ठिकाणी न्यावे लागत असल्याने, ही कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. या बाबींचा विचार करून राज्यातील काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्स ऐवजी साधे मोबाइल फोन वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती अपर पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. तसेच यावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास केली होती. या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने देखील मान्यता दिली आहे. त्यानुसार आज पासून ही सुविधा सुरू करण्यात आली.
इतका वेळ कैद्यांना घरच्यांशी बोलता येणार : या स्मार्ट कार्डचे काम ॲलन ग्रुप, एल ६९ मणिकंपलयन हाऊसिंग युनिट, इरोड, तमिळनाडू यांच्या मार्फत पुरविण्यात आले आहे. ही स्मार्ट कार्ड सुविधा कारागृहातील बंद्यांना पात्रतेनुसार महिन्यातून 3 वेळा 10 मिनिटांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे बंद्यांना स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधणे अधिक सोईस्कर झाले आहे. बंद्यांचा नातेवाईकांशी तसेच वकिलांशी सुसंवाद झाल्याने कारागृहातील बंद्यांचा मानसिक ताण-तणाव कमी होऊन, कारागृह सुरक्षेचा प्रश्न काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे बंद्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होईल. तसेच येरवडा कारागृहातील या सुविधेचा आढावा घेऊन राज्यातील इतर कारागृहामध्ये देखील याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये स्मार्ट कार्ड फोन सुविधामध्ये आणखी सुधारणा करून पात्रतेसंदर्भात शिथीलता आणण्याचा देखील विचार करण्यात येणार आहे.