पुणे - जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या यवत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव येथे ६ डिसेंबरला एका व्यक्तीची सोन्याच्या दोन चैन आणि दुचाकी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी अटक केलेल्या या आरोपीवर खून, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबरला दिलीप लक्ष्मण चौधरी (रा.सोरतापवाडी, ता.हवेली) हे त्यांची दुचाकीवरून (एम.एच.१२/ के.झेड/९५०८) नातेवाईकाच्या लग्नासाठी दौंड तालुक्यातील पारगाव येथे आले होते. लग्नानंतर ते मोटार सायकलवरून निघाले होते. त्यावेळी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीतील पंडीता रमाबाई मुक्ती मिशनच्याजवळ असलेल्या उड्डाण पुलावर आले असता थंडी वाजू लागल्याने त्यांनी मोटार सायकल रस्त्याच्या बाजूला ठेवली. त्याठिकाणी ते गाडीतून स्वेटर काढत होते. आरोपीने त्यांच्याशी झटापट करत त्यांना मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याच्या दोन चैन हिसकावून त्यांना धक्का दिला आणि त्यांच्या दुचाकीसह १ लाख ६ हजारांचा ऐवज लंपास केला.
हेही वाचा -मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू