बारामती - पर्यावरण संवर्धन व जल साक्षरतेसाठी विदर्भातील एक तरुणी गेल्या 8 महिन्यांपासून सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण करत आहे. प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे असे त्या तरुणीचे नाव आहे. ती मुळची राहणार यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुक्याच्या पुनवट गावातील आहे. प्रणालीचे शिक्षण बी.एस.डब्ल्यू झाले आहे. व्यवसायिक समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या प्रणालीने दिवसेंदिवस वातावरणात होत असलेले वेगवेगळे बदल, ग्लोबल वार्मिंग, जल, तापमान वाढ आदींबाबत समाजात जनजागृती करण्याचा ध्यास घेतला आहे. प्रणाली मागील आठ महिन्यांपासून विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र करून शनिवारी (17 जुलै) बारामतीत आली. यावेळी प्रणालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व प्रबोधन करत असल्याची माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी प्रणालीचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.
'समाजाची भोगवादी जीवनशैली'
'समाजाने अतिरिक्त भोगवादी जीवनशैली अंगिकारली आहे. सर्वांच्या गरजांचा आवाका वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्हास होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या औद्योगीकरण, काँक्रीटीकरण, शहरीकरण, यांत्रिकीकरणामुळे आपली विकासाची संकल्पना आज बदलून गेली आहे. कोरोना काळात शेती वगळता सर्वच उद्योग बंद होते. शेतीनेच आपल्याला या काळात जगवलं. मात्र शेतीत मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. याच बाबी विचारात घेऊन सायकलवरून प्रबोधन करत आहे', असे प्रणालीने सांगितले.