दौंड(पुणे) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे चारचाकी वाहनातून येऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. या चार जणांकडे कटावणी, चाकू, मिरची पूड, कटर आणि एक चारचाकी मिळून आली आहे. ही कारवाई यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा -बंगालमधील भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू; तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप
पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळाले
केडगाव येथील पोलिसांनी कारवाई करत रात्रपाळीच्या पेट्रोलिंगवेळी बाजारपेठेलगत संशयित कार विना नंबर प्लेटची उभी दिसली. यावेळी पोलिसांना पाहताच गाडीतील पाच जणांनी पळ काढला. यावेळी पाठलाग करत पोलिसांनी ५ पैकी ४ दरोड्याच्या पावित्र्यात असणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद केले आहेत. अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर फरार झाला.
चार जणांना अटक, एक जण फरार -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिफ फकिर मोहम्मद (वय २८ रा नॅशनल सोसायटी अहमदनगर), कमलेश बाळासाहेब दाणे (वय २१ रा. नारायण ढेह, अहमदनगर), सलमान सादिक शेख (मोमिनपुरा बीड), सालिम दगडू पठाण (वय २८ रा. मुकुंदनगर,अहमदनगर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यावेळी त्यांच्याकडे ४ मोबाईल, १ कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड, आठ फूट लांबीची सुती दोरी, १ चाकू व पांढऱ्या रंगाचे होंडा सिटी कार, २ लोखंडी कटावणी, १ लोखंडी कटर काळ्या रंगाचे बुरखे, २ नंबर प्लेट या मुद्देमालासह आढळून आले यावरून ते चोरीच्या तयारीत होते.
कारवाई करणारे पथक :
ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गपंले, पोलीस नाईक आर आर गोसावी, पोलीस नाईक डी एस बनसोडे, पोलीस नाईक बी व्ही चोरमले, पोलीस नाईक काळे, पोलीस कॉन्स्टेबलव्ही एल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल टी ए करे, पोलीस कॉन्स्टेबल गडदे यांनी कारवाई केली.
रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोड्यांना आळा बसेल
केडगावात वारंवार बंद सदनिका फोड्या व रात्रीच्या वेळी बऱ्याच चोऱ्या झाल्याने पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवली होती. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी प्रत्येक दिवशी रात्रीची गस्त सायरन वाजवत केली. त्याचा परिणाम आता दिसत आहे . तसेच पोलिसांनी दरोडेखोरांची टोळी पकडल्याने रात्रीच्या घरफोड्यावर आता आळा बसेल अशी नागरिकांत चर्चा आहे.
हेही वाचा -शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, 31 मार्चला होणार एन्डोस्कॉपी