पुणे -जपानच्या टोकियो शहरात 23 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारताने 126 खेळाडू पाठवले आहे. या 126 खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील दहा खेळाडूंचा समावेश आहे. महाराष्ट्रातील हे खेळाडू आपआपल्या खेळात दिगग्ज असल्याने ते देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची दाट शक्यता आहे. परंतु असे असले तरीही 120 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातून हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच खेळाडू यशस्वी होताना दिसतात.
ऑलिम्पिकमध्ये भारताला म्हणावे तसे यश का मिळत नाही याविषयी अधिक माहिती देताना अर्जुन पुरस्कार विजेते, पैलवान काका पवार म्हणाले, 'ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी लागणारी सुसज्ज मैदाने आपल्याकडे नाहीत. जी बोटावर मोजण्याइतकी मैदाने आहेत त्यावर राजकारण्यांनी कब्जा केला आहे. खेळांसाठी बांधलेल्या या मैदानाचा वापर लग्नासाठी, राजकीय कार्यक्रमासाठी सर्रास होतो. पुण्यातील बालेवाडी येथे बांधलेल्या मैदानावर सराव करण्याची संपूर्ण व्यवस्था आहे. परंतु या ठिकाणी खेळाडूंना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत, योग्य क्षमतेचे प्रशिक्षक नाहीत. त्यामुळे इतके चांगले मैदान असूनही सुविधांअभावी याचा योग्य वापर करता येत नाही.'
खेळामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे
ज्या देशांना खेळामध्ये रुची असते त्या देशांमध्ये खेळाडूंची देखभालही योग्य प्रकारे केली जाते. काही वर्षांपूर्वी चीन प्रत्येक खेळात मागे होता. आता मात्र परिस्थिती बदलली असून अवघ्या काही वर्षात चीनने कठोर मेहनत करीत अव्वल स्थान मिळवले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत खुप मागे आहे. 100 वर्षाचा काळ गेला तरी आपण त्या देशांची बरोबरी करू शकत नाही. भारताला जर ऑलिम्पिकमधून पदक पाहिजे असतील तर खेळामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच झाला पाहिजे. खेळाडूंना पुरेपूर सुविधा दिल्या पाहिजेत. इतर देशात कशाप्रकारे तयारी केली जाते याची माहिती होण्यासाठी त्या त्या देशात खेळाडूंना पाठवले पाहिजे. 100 खेळाडूंना तयार करण्यापेक्षा चांगले खेळणाऱ्या 10 खेळाडूंची निवड करून त्यांच्यावरच खर्च करण्यात यावा, असे देखील काका पवार म्हणाले.
बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये या खेळांना सुविधा
महाळुंगे बालेवाडी येथे येथील छत्रपती क्रीडा नगरी संकुल विषयी अधिक माहिती देताना राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, या क्रीडानगरीत सध्या जिम्नॅस्टिक, स्विमिंग, बॅडमिंटन, लॉन टेनिस, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, जुडो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल यासारख्या अनेक खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. तर आगामी काळात खोखो, कबड्डी, आर्चरी, बॉक्सिंग, रेसलिंग, यासारखे नवीन खेळ खेळण्याच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे.