पुणे -हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची यादी काढली असता पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मागील आठ महिन्यात महिला अत्याचाराचे तब्बल 983 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
संपूर्ण राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठ महिन्यात बलात्काराच्या तब्बल 125 घटना उघडकीस आल्या आहेत. तर विनयभंगाच्या तब्बल 459 घटना घडल्या आहेत. त्याशिवाय अपहरणाचेही 198 गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी पाहता पुढारलेल्या पुणे जिल्ह्यातही महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा रस्त्यांवर, बाजारात, शाळा-महाविद्यालयात मुलींची छेड काढली जाते. पण बदनामीच्या भीतीपोटी अनेक महिला तक्रार करत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाही. परिणामी टवाळखोरांचे चांगलेच फावते.
महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही - अभिनव देशमुख