पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक महिला वाहतूक पोलीस लाच घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. स्वाती सीताराम सोन्नर असे लाच घेतल्याचा आरोप असलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये लाच घेतल्याचे स्पष्ट होत असूनही या पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेने तिची चूक अद्याप कबूल केलेली नाही.
लाच घेणारी 'ती' महिला पोलीस निलंबित चोर तो चोर वर शिरजोर असाच काहीसा प्रकार...लाचखोरीच्या या व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील महिला कर्मचारी तिच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावत आहे. सोन्नर यांना पैसे देणारी महिला यांच्या ओळखीची आहे. त्या महिलेने वस्तू खरेदी केली होती. त्यावेळी सोन्नर यांनी त्यांना पैसे दिले होते. त्यांनी ते पैसे त्या दिवशी परत दिले आहेत, असा खुलासा सोन्नर यांनी दिला आहे. मात्र, पोलिसाच्या गणवेशात अशा प्रकारे गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्या इतर अधिकाऱ्यांसह कर्तव्य बजावत होत्या-दोन दिवसांपूर्वी पिंपरीतील मुख्य बाजारपेठेतील चौकात महिला वाहतूक पोलीस स्वाती सीताराम सोन्नर या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्तव्य बजावत होत्या. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना त्यांनी अडवलं, काही मिनिटांमध्ये त्या पैकी एक महिला दुचाकीवरून खाली उतरली. वाहतूक पोलीस स्वाती यांनी इतरांची नजर चुकवून पॅन्टच्या पाठीमागील खिशात पैसे टाकण्यास त्या महिलेला सांगितले. महिला पैसे दिल्यानंतर काही क्षण देखील थांबल्या नाहीत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पैसे दिलेली महिला ओळखीची असल्याचा खुलासा-त्यानंतर त्यांना लेखी खुलासा देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. स्वाती यांनी त्यांची चूक कबूल न करता त्या ओळखीच्या असल्याचं सांगत पळवाट काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांनी केलेले गैरवर्तन आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी वाहतूक पोलिसांनी दिली आहे.