पुणे- कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा, त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुन प्राण गमावून बसतात. पुण्यात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. कोरोना विषाणूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 30 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी दुर्लक्ष केल्यामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
कोरोना विषाणूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष; पुण्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
कोरोना विषाणूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने येरवड्यातील 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रशासनाने कोरोना लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
येरवड्यातील 30 वर्षीय महिलेला सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी 1:15 वाजता तिचा मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिची मृत्यूनंतर कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाली. या महिलेची 'मेडिकल हिस्ट्री' तपासली असता 22 मे पासून तिला ताप, श्वास घेण्यास त्रास होणे अशी कोरोनासदृश्य लक्षणे होती. परंतु,त्यांनी डॉक्टरांकडे जाण्याचे टाळले. जास्त त्रास झाल्यानंतर त्या सोमवारी दवाखान्यात गेल्या. परंतु त्यांचा मृत्यू झाला. जर त्या वेळीच डॉक्टरांकडे गेल्या असत्या तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.
ससून रुग्णालयात 22 मे रोजी सुद्धा एका 21 वर्षीय तरुणाचा अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. गुलटेकडी परिसरात वास्तव्यास असलेल्या या तरुणाला 15 दिवसांपासून कोरोनाची लक्षणे असल्याचे आढळले होते. परंतु, याविषयी डॉक्टरांना न सांगता तो घरातच बसून राहिला. दरम्यान शुक्रवारी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अवघ्या अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला.