महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार महिन्याच्या बाळाचे अपहरण करणारी महिला जेरबंद; बाळाची सुखरूप सुटका

तक्रारदार महिलेची आणि आरोपी महिलेची बसमध्ये ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन तिने या चार महिन्याच्या चिमुरड्याला पळवून नेले. तपासादरम्यान पोलिसांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही दृश्ये तपासली असता ही संशयित महिला दिसून आली होती.

पुणे
पुणे

By

Published : Nov 20, 2020, 7:48 PM IST

Updated : Nov 20, 2020, 10:41 PM IST

पुणे- हडपसर परिसरातून दोन दिवसांपूर्वी चार महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 23 वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी महिलेला पोलिसांनी जेरबंद केले असून अपहृत बाळाची सुखरूप सुटका केली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी
अरुणा राजेंद्र पवार (वय 36) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात वास्तव्यास आहे. तक्रारदार महिलेची आणि आरोपी महिलेची बसमध्ये ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन तिने या चार महिन्याच्या चिमुरड्याला पळवून नेले. तपासादरम्यान पोलिसांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही दृश्ये तपासली असता ही संशयित महिला दिसून आली होती. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत मांजरी परिसरातील साई समर्थ सोसायटीतून या महिलेला अटक केली.

तक्रारदार महिलेचे पतीसोबत भांडण

तक्रारदार महिलेचे पतीसोबत भांडण झाल्याच्या रागातून तिने चार महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले होते. मूळची लोणी गावातील असलेली ही महिला अहमदनगरमध्ये गेली त्यानंतर तेथून तिने अहमदनगर ते सातारा बस पकडली. या प्रवासादरम्यान तिच्या शेजारी आणखी एक महिला येऊन बसली तिने तिच्याशी ओळख वाढवत गप्पा मारल्या. त्यानंतर या दोघी महिला स्वारगेट बसस्थानकावर उतरल्या तेथून त्या हडपसर परिसरात गेल्या.

खाऊ आणते, असे सांगून गेली ती परत आलीच नाही

हडपसरमध्ये गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला घेत खाऊ आणते, असे सांगून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ शोधा-शोध केल्यानंतरही आपले बाळ सापडत नसल्याचे पाहून तक्रारदार महिलेने हडपसर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. दरम्यान, महिलेने या चिमुकल्याचे अपहरण कशासाठी केले होते याची माहिती मात्र अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. आरोपी महिलेला 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Last Updated : Nov 20, 2020, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details