पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतून अखेर संभाजी ब्रिगेडने माघार घेतली आहे. शिवसेना महाविकास आघाडीत असल्यामुळे ही सगळी जबाबदारी शिवसेनेची होती. ती शिवसेनेने शिष्टाई योग्य प्रकारे केल्याने संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवारी माघारी घेतलेली आहे.
महाविकास आघाडीचा करणार प्रचार : कार्यकर्त्यांना चांगला मानसन्मान मिळावा यासाठीच ही उमेदवारी दाखल केली होती परंतु आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आदेश आले. त्यामुळे आम्हीही माघार घेत आहोत. यापुढे आम्ही महाविकस आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करू असे यावेळी उमेदवार अविनाश मोहिते यांनी म्हटलेलं आहे.
उद्धव ठाकरे,अजित पवार यांच्यात चर्चा : राजकारणामध्ये विचार वादविवाद हे होत असतात परंतु शेवटी संभाजी ब्रिगेडचे मावळे हे आदेश मानणारे असतात. मावळ्याने आदेश मानायचा असतो. त्याप्रमाणे काल उद्धव ठाकरे,अजित पवार यांच्या मध्यस्थीने काही चर्चा झाली. त्या चर्चेने आमचे समाधान झाले असून संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच आम्ही माघार घेतली आहे. यापुढे काँग्रेसने आम्हाला सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.