पुणे -दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचा पाठिंबा आहे. शेती संदर्भात जरी केंद्र सरकारने कायदा केला असला, तरी राज्य सरकारने मात्र तो कायदा केलेला नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांबरोबर विचारविनिमय करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार हेही वाचा -पुणे-नाशिक महामार्गावर विविध संघटनांचे चक्का जाम आंदोलन
उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या इतिहासात आजवर शेतकऱ्यांसंबंधी अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आज एकही भाजप नेता बोलत नाही, असे अजित पवार म्हणाले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, दत्तामामा भरणे मंत्री झाले तरी कधी जॅकेट घालतात का? मी कधी जॅकेट घातल्याचे दिसलो का, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री तथा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना नाव न घेता लगावला. तसेच, इंदापूरचा दूध संघ बंद पाडला, तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही, असा प्रश्न पाटील यांना करून, ज्यांनी इंदापूरचे पाणी पळवले त्यांच्या पक्षात ते गेल्याची टीका अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.
कोरोना अजून संपलेला नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी
कोरोना पार्श्वभूमीमुळे मध्यंतरी जाहीर कार्यक्रम घेता आले नाहीत. कोरोना महामारीत मोठे नुकसान झाले असून अनेकांना आपला जीव गमावावा लागला. आता कोरोनाचे सावट कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाला. काळजी घ्या, इथे कुणीच मास्क लावलेला दिसत नाही. कोरोना कुणालाच सोडत नाही. ना दादाला ना मामाला. दादालाही कोरोनाने सोडले नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कोरोना संबंधी काळजी घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा -सरकार स्थिर, फडणवीसांना पाच वर्षे स्वप्न पाहावी लागणार- सुभाष देसाई