पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असताना कुटुंबाला स्वतः पासून दूर ठेवत आहेत. काहींनी तर पत्नी, मुलाला गावी पाठवले आहे. त्यात लॉकडाऊन असल्याने अनेकांना सकाळचा नाश्ता मिळत नाही. परंतु, एका पोलीस पत्नीने पुढाकार घेऊन सोसायटीमधील एकाची मदत घेत दररोज सकाळी चहा आणि नाश्ता तर सायंकाळी पुन्हा चहा पोलिसांना देण्याचं काम कविता नितीन नम या करत आहेत.
कविताचे पती नितीन हे हवेली पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांना दररोज जेवणाचा डबा देतात. परंतु, तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना चहा किंवा नाश्ता मिळत नसल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यावरून पिंपरी-चिंचवड पोलिसांचेदेखील असे असेल ना, असा प्रश्न कविता यांनी उपस्थित केला आणि त्यांना सकाळचा चहा नाश्ता दिला तर असे नितीन यांना विचारले असता त्यांनी होकार दिला.
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस पत्नीचा स्तुत्य उपक्रम; पोलिसांना देताहेत मोफत चहा-नाश्ता पती नितीन यांनी पाठबळ दिल्यानंतर कविता यांनी पुढाकार घेत सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व पोलीस स्टाफला त्या चहा आणि नाश्ता पुरवत आहेत. सकाळी सहा वाजता कविता यांचा दिनक्रम सुरू होतो. जवळपास शंभर जणांना चहा नाश्ता बनवतात. त्यानंतर किशोर या काकांच्या मदतीने नाकाबंदीवर आणि पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना नाश्ता देतात. एवढ्या आपुलकीने दिलेला नाश्ता हा घरच्या चवीपेक्षा कमी नसल्याची प्रतिक्रिया येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्याच्या परिस्थितीला पोलीस हे देवदुतापेक्षा कमी नाहीत पण त्यांच्याही काही गरजा असून त्या पुरवणे महत्त्वाचे आहे. पोलीस पत्नी कविता यांनी त्या ओळखून पोलिसांना नाश्ता दिल्याने आपल्याला समाधान मिळत असल्याचे कविता यांनी सांगितले.