राजगुरुनगर (पुणे) - निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी उमेदवाराला त्याचे चाहते, कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात खांद्यावर घेऊन मिरवणूक काढताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण पती निवडून आला म्हणून पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढली, अशी घटना तुम्ही आजपर्यंत ऐकली नसेलच. मात्र अशी घटना घडली आहे पुण्यातील पाळू या गावात.
चक्क पतीला खांद्यावर घेतले
खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळू गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. संतोष यांच्या या विजयानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगणाला भिडला आणि तिने चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला.
निवडणूक जिंकल्यानंतर कारभारीला खांद्यावर घेत कारभारणीने काढली मिरवणूक ...तरीही विजयाचा जल्लोष
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे व गर्दी करणे, यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना रेणुका गुरव यांनी आपले पती संतोष यांना खांद्यावर घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत गावांमध्ये फेरी मारली. त्यांच्यामागे कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण केली. तिच्या या जल्लोषाचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोलाचा मोठा वाटा होता.
हेही वाचा -धनंजय मुंडेंबाबत सत्यता पडताळून निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री
हेही वाचा -राष्ट्रवादीची सत्ता नसलेल्या ग्रामपंचायतीसाठीही प्रामाणिकपणे निधी आणला जाईल - रोहित पवार