पुणे - राज्य सरकारने कोरोनामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीतून राज्यातील 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मात्र राज्य सरकारचा हा निर्णय पटला नसून मुंबईत एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी -
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटमध्ये म्हणतात, 'पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांच्या आत असतानाही तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. या पार्श्वभूमीवरच पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणीही केली आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने पुण्याला न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे.' अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
पुणे व्यापारी महासंघाचा घंटानाद आंदोलनाचा इशारा -
दरम्यान, पुणे शहरातील व्यापारी देखील प्रशासनाच्या निर्णयावर नाराज आहेत. पुणे व्यापारी महासंघाने शासनाच्या या निर्णयाविरोधात घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, राज्य सरकारने पुण्याच्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत निराशाजनक आहे. पुण्यातील रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध तरी कमी करणे गरजेचे होते. मात्र, परिस्थितीचा विचार न करता पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्याला आमचा विरोध आहे. राज्य सरकारने तात्काळ या निर्णयात बदल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.