पुणे: मानवाधिकार कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं बरोबर 1 वर्षापूर्वी 5 जुलैला निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला होता. स्वामींवर ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोण होते फादर स्टॅन स्वामी...काय आहे कोरेगाव भीमा प्रकरण (What is the Koregaon Bhima case ) याबाबत जाणून घेऊया...
समाजशास्त्राचे अभ्यासक :स्टॅन स्वामींचा जन्म 26 एप्रिल 1937 रोजी तामिळनाडूच्या त्रिची येथे झाला. (Who was Father Stan Swami) त्यांचे वडील शेतकरी होते. आई गृहिणी होती. त्यांनी समाजशास्त्रात एमए केलं होतं. त्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं. नंतर झारखंडमध्ये आल्यावर त्यांनी आदिवासी आणि वंचितांसाठी काम सुरू केलं होतं.
आदिवासींच्या हक्कासाठी संघटना :सुरुवातीला स्वामी यांनी पाद्री म्हणून काम पाहिलं. झारखंडमध्ये आदिवासींनी त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष सुरू केला होता. त्यावेळी स्वामींनी झारखंडमध्ये विस्थापन विरोधी जनविकास आंदोलन या संघटनेची स्थापना करून मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. दलित आणि आदिवासींच्या हक्कासाठी ही संघटना कार्यरत आहे. रांचीच्या नामकुम क्षेत्रात आदिवासी मुलांसाठी ते शाळा आणि टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यू चालवत होते. पत्थलगढी आंदोलनात जमावाला भडकावल्याचा आणि सरकार विरोधी विधानं केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे झारखंडच्या पोलीस ठाण्यात स्वामींसह 20 जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भीमा कोरेगाव प्रकरण :पुण्यात 2018 मध्ये एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव परिसरात हिंसा उसळली होती. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली होती. नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली होती.राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फादर स्टेन यांना रांचीवरून ऑक्टोबर २०२० मध्ये अटक केली होती. त्यावेळेस त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. एनआयएनने स्टेन यांच्या विरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कारवाई केली होती.या प्रकरणात आत्ता पर्यंत अनेक राजकीय लोकांचे जवाब नोंदविण्यात आले आहे.