पुणे Sharad Pawar PC -राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. अजित पवार यांनी कर्जतमध्ये केलेले गौप्यस्फोट आणि प्रफुल पटेल यांनी केलेल्या दाव्यांचा पवारांनी हसत हसत समाचार घेतला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही उपस्थित होते.
अजित पवारयांच्यावर टीका करताना शरद पवार यांनी, पक्ष सोडणारे पुन्हा विधानसभेत दिसत नाहीत, याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. त्याचबरोबर माझ्याबरोबर किती आमदार आहेत, ते आज सांगणार नाही. ते योग्यवेळी सांगणार असं सांगून पवारांनी त्यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत, ते गुलदस्त्यात ठेवलं. नरेंद्र मोदी यांनी भर सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे हे आरोप नेमके कुणावर केले ते तुम्हीच शोधा, असा सूचक सवालही पवारांनी पत्रकारांनाच केला. इंडिया बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या की दिल्लीत इंडियासंदर्भात बैठक होईल, अशी माहिती पवारांनी दिली.
प्रफुल पटेलांनी जरूर पुस्तक लिहावे - अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी कर्जतच्या त्यांच्या राष्ट्रवादी गटाच्या शिबिरानंतर अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्यावर आज पवार फटकेबाजी करणार अशी अपेक्षा होती. मात्र अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यांना आपण गांभिर्यानं घेत नसल्याचीच भूमिका शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेऊन त्यातील हवाच काढून घेतली. प्रफुल पटेल यांना पराभूत होऊनही मंत्रिपंद दिलं, त्याची खंत आहे. त्याचवेळी त्यांच्या पुस्तकाची आपण वाट बघत असल्याचाही चिमटा शरद पवारांनी काढला. लोक पक्ष का सोडून जातात यावर प्रफुल पटेलांनी एक प्रकरण त्यात लिहावं. तसंच ईडीच्या त्यांच्यावरील कारवाईवरही त्यांनी प्रकरण त्या पुस्तकार लिहावं असा सल्लाही पवारांनी दिला. ईडीने प्रफुल पटेल यांच्या घराचा ताबा घेतला होता. त्यावेळी काय-काय झालं त्याबद्दलही त्यांनी लिहावं. ते वाचून आमच्याही ज्ञानात भर पडेल असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होईल, अशा प्रकारची चर्चा आहे. त्यावर मिश्किलपणे हसून शरद पवार म्हणाले की, पवार विरुद्ध पवार कसं होईल. वास्तविक बारामतीच्या खासदार या सुप्रिया सुळे आहे. त्यामुळे पवारांच्या बोलण्यातून सुप्रिया सुळे यांनाच तिकीट मिळणार हे स्पष्ट झालं. त्याचवेळी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्याकडे बघून शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देतील तो निवडणूक लढवेल. शेवटी लोकशाही आहे. विरोधकांना त्यांची भूमिका घेऊन जनतेमध्ये जाण्याचा लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. लोकांना काय सांगायचं याची चिंता त्यांना, म्हणजेच अजित पवार गटाला आहे. त्यामुळे ते वारंवार आम्हीच राष्ट्रवादी असल्याचं सांगत आहेत. मात्र लोकांना सत्य माहीत आहे. त्यामुळे मतदान करताना शेवटी जनता काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल.