बारामती उपविभागात गव्हाची सरासरीच्या १०० टक्के क्षेत्रावर पेरणी - baramati wheat sowing news
गव्हाचे सर्वाधीक क्षेत्र बारामती तालुक्यात असून ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. तसेच हरभरा पिकाच्या पेरणी क्षेत्रात देखील बारामती तालुक्याने आघाडी घेतली असून ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत.
बारामती - बारामती उपविभागामध्ये गव्हाच्या सरासरीच्या १०० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्या खालोखाल हरभरा पिकाच्या खालील क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. मागील वर्षी दमदार पाऊस झाल्याने रब्बीच्या पिकांना फायदा झाला आहे. अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.
८ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या पूर्ण
रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पेरण्या या अगदी डिसेंबर अखेर होत असतात. बारामती उपविभागातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यात रब्बीची पिके सध्या बहरात आहेत. गव्हाचे सर्वाधीक क्षेत्र बारामती तालुक्यात असून ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. तसेच हरभरा पिकाच्या पेरणी क्षेत्रात देखील बारामती तालुक्याने आघाडी घेतली असून ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत. साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू असल्याने ऊसाच्या मोकळ्या झालेल्या क्षेत्रावर शेतकरी गहू, हरभरा आदी पिके घेत असतात. तसेच बागायती भागासह जिरायती भागात देखील पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने यंदा गहू व हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र सरासरीपर्यंत पोहोचले आहे.
तांबेरा रोगाचा गव्हावर प्रादुर्भाव झाला नाही
मागील आठ दिवसात ढगाळ हवामानामुळे गहू, हरभऱ्यावर रोगराईचे संकट आले होते. मात्र योग्य काळजी व वेळीच झालेली औैषध फवारणी यामुळे तांबेरा रोगाचा गव्हावर फारसा प्रादुर्भाव झाला नाही. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुन्हा थंडीने जोर धरला आहे. त्यामुळे गहू पोट्यात येण्यास तर हरभऱ्याचे घाटे भरण्यास मदत होणार आहे. परिणामी निसर्गाने साथ दिल्यास यंदा शेतकऱ्यांना गहू आणि हरभऱ्याचे चांगले उत्पादन हाती लागणार आहे.
बारामती उपविभागातील गहू, हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- तालुका - गहू - हरभरा
- बारामती - ८,४०० - ६,५००
- इंदापूर -५,६०० - २,५००
- दौैंड - ४,५०० - १,६००
- पुरंदर - ४,८०० - ३,६००